छोटी सी कहानी से

छोटीसी कहानी से ...


वरवर अॅकाॅर्डीयन आणि बास गिटारसाठी हवंहवंसं वाटणारं हे गाणं प्रत्येकवेळी नवीनच काहीतरी सांगून जातं !

शांत, गंभीर गाण्यांतही पंचमदांनी इलेक्ट्राॅनीक रिदमचा उपयोग - फक्त काही मात्रांसाठी - फार खुबीनं केलाय ... हे त्याचंच एक मस्त उदाहरण. मादल /डुग्गीबरोबरचं हे काॅम्बीनेशन इतकं जमून आलंय की ते कृत्रीम राहतच नाही ...

उंचावरून खाली येणार्‍या जलप्रपातांप्रमाणंच तार सप्तकातून मंद्र सप्तकाकडं झेपावणार्‍या व्हायोलीन्स आणि बासरीच्या स्वरांनी सुरवात होते आणि अॅकाॅर्डीयनची मुख्य धून आपल्याला आशाजींपर्यंत नेते ..

मुख्य आवाजाच्या मागं ऐकू येणार्‍या आशाजींच्याच लकेरी, आणि त्याच्याही मागं वाजणारे बासरीचे थरथरणारे स्वर ... मनातले कल्लोळ म्हणजे आणखी काय?

पानी में आॅंसू थे, मिलके पराये थे अशा नाट्यमय ठिकाणापुरताच कोमल ग ऐवजी शुद्ध ग चा केलेला थरारक वापर ...

दुसर्‍या आणि तिसर्‍या कडव्याच्या आधीच्या संगीतात एकाच वेळी दोन -तीन थरात वाजणारे व्हायोलीन्सचे ताफे ...

तिसर्‍या कडव्याच्या आधी, पंचमच्या पार्श्वभूमीची आठवण देणारी बासरीवरची टिपीकल उत्तर-पूर्व भारतीय लकेर ...

*फांद्यांवर "अडकून" राहिलेले थेंब - क्षण*  ह्या गुलजार साहेबांच्या चित्रपटांमध्ये आणि लेखनामध्ये नेहमी आढळणार्‍या प्रतिमा ...

*वार्‍याच्या छोट्याश्या धक्क्यानं या पागोळ्या पाण्यात पडतील तेव्हा कसं संगीत निर्माण होईल ?*

पंचम आणि टीमची कमाल ऐका ... 0:34, 1:49, 3:04 आणि तत्सम ठिकाणी !

'इजाजत' मधली कुठलीच व्यक्तिरेखा इच्छीत अथवा अपेक्षीत ठिकाणी पोहचत नाही ... या गाण्याचा शेवट ऐका ...  रूळलेल्या स्केल्समधून पुढं सरकणार्‍या गाण्याचा आवेग हळूहळू मंदावतो आणि अनपेक्षीत ठिकाणीच गाणं थांबतं !

तेव्हा आपल्याला जाणीव होते, चित्रपटाच्या शेवटी प्लॅटफाॅर्मवरच्या दृश्यात जो धक्का आपल्याला बसतो, तोच या गाण्याच्या शेवटाशी साधर्म्य सांगणारा आहे !

ये कहानी छोटी नहीं !


अनिरुद्ध दीक्षित   ।   संस्कृती

https://drive.google.com/file/d/18hz8vHC9EqqdP8WBTHIRchiD4unp3mgz/view?usp=drivesdk

Comments

Popular posts from this blog

सोप्पी सुरुवात : गाणं कसं ऐकावं ? किंवा गाण्यात काय ऐकावं ?